चंद्रपूर : २२ जानेवारी – विधानसभेचे माजी उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे आज (दि. २२) पहाटे वरोरा येथे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कधीकाळी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेकडून वरोरा विधानसभा मतदार संघातून सलग दोन वेळा निवडणूक जिंकून आमदार झालेले ॲड. टेमुर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होताच शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सक्रिय होते. शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. नुकतीच त्यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून केली होती. या मागणीमुळे ते चर्चेत आले होते.
दरम्यान, ॲड. टेमुर्डे यांचे पार्थिव देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दान करणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.