बाबा रामरहीम याची पॅरोलवर सुटका

चंडिगड : २२ जानेवारी – डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग याची ४० दिवसांच्या पॅरोलवर हरयाणाच्या रोहतक येथील सुनारिया कारागृहातून शनिवारी दुपारी सुटका करण्यात आली. रोहतकच्या पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
उत्तर प्रदेशच्या बागपतमधील बरनावा येथील डेरा सच्चा सौदा आश्रमात तो जाणार आहे, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले. आपल्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला २० वर्षांच्या कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याला तीन महिन्यांआधीही पॅरोल मंजूर झाला होता. आता ४० दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे. हे नियमानुसार आहे, असे रोहतकचे विभागीय आयुक्त संजीव वर्मा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले होते. या आधी मंजूर झालेल्या पॅरोलचा कालावधी २५ नोव्हेंबरला संपला. तेव्हाही तो त्याच्या बरनावा आश्रमात गेला होता. आता तो डेराचे माजी प्रमुख शहा सतनाम सिंग यांच्या २५ जानेवारीला होणाऱ्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply