नेताजी सुभाषचंद्र बोस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणी परस्परभिन्न – नेताजींच्या कन्या अनिता बोस

कोलकाता : २२ जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणी परस्परभिन्न असून त्या कोणत्याही प्रकारे मेळ साधत नाहीत, अशी स्पष्टोक्ती नेताजींच्या कन्या अनिता बोस-फाफ यांनी केली. जर्मनीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या अनिता यांनी दूरध्वनीवरून वृत्तसंस्थेस मुलाखत दिली. संघातर्फे कोलकात्यात मोठ्या प्रमाणात नेताजींची जयंती (२३ जानेवारी) साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमास सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनिता यांनी हे मतप्रदर्शन केले.
या प्रकारच्या कार्यक्रमांद्वारे नेताजींच्या वारशाच्या माध्यमातून काही प्रमाणात स्वार्थ साधण्याचा संघ-भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, नेताजी व त्यांची विचारसरणी पूर्णपणे भिन्न आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर ही मंडळी उजव्या विचारसरणीची आहेत व नेताजी डाव्या विचारसरणीचे होते. नेताजींच्या धर्मनिरपेक्षतेच्या जवळपास जाणारे भारतात कोणी असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे, असेही त्या म्हणाल्या.
नेताजींना हिंदू धर्माविषयी आदर होता. परंतु, ते सर्व धर्मांचा तितकाच आदर करीत असत. विविध धर्मियांमध्ये परस्पर सहकार्य असावे, अशी त्यांची धारणा होती. नेताजींची ही विचारधारा भाजप किंवा संघाच्या विचारसरणीत आढळत नाही. नेताजींनी संघावर टीका केल्याचे एखादे विधान मी सांगू शकत नाही. परंतु, त्यांचा संघाविषयीचा दृष्टिकोन मला निश्चितच माहीत आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने नेताजींविषयी विशिष्ट धोरण निश्चित केले होते. सविनय कायदेभंग चळवळीमुळेच स्वातंत्र्य मिळाले हे त्यांनी कायम ठसवले. परंतु, भाजपने नेताजींसंबंधी फायली खुल्या केल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीतील नेताजींचे योगदान देशापुढे आले, अशा शब्दांत अनिता यांनी मोदी सरकारचे कौतुक केले. परंतु, नेताजी आज असते व त्यांनी संघ-भाजपवर टीका केली असती तर या सरकारने त्यांचा सन्मान केला नसता, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply