अंगणवाडीतील मुलांच्या पोषण आहारात आढळली पाल

अकोला : २२ जानेवारी – अंगणवाडीतील मुलांच्या पोषण आहारात पाल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील सारकिन्ही गावात हा प्रकार उघडकीस आला आहे. तब्ब्ल १२ चिमुकल्यांसह चार महिलांनी ही खिचडी खाल्ली होती. सुदैवाने यातून कोणालाही काही झालं नाहीये. सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकारी इंगळे यांनी सांगितलं.
दरम्यान, अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी तांदळाची खिचडी शिजवायला टाकली. त्यावर झाकण न ठेवल्यामुळे त्या खिचडीच्या पातेल्यामध्ये ‘पाल’ पडली आणि ती पूर्ण खिचडीत शिजली. त्यानंतर तीच खिचडी मुलांना खाण्यासाठी दिली. त्यावेळी आंबेकर या पाच वर्षीय मुलाच्या खिचडीत पाल दिसून आली. यातील काही विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली. कुणालाही पोटदुखी तसेच मळमळ झाली नाही. परंतु १५ जणांना रुग्णालयात एडमिट करण्यात आले आहे.
मात्र, आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थी दाखल करण्यात आले. दरम्यान, खिचडी बनवताना हलगर्जी करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply