संपादकीय संवाद – राजकारण्यांचे वर्तन लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकेल

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन राज्यशासनाच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ यासाठी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मुंबईत एका जाहीर सभेलाही संबोधित केले. अपेक्षेनुसार मोदी विरोधकांनी तसेच भाजप आणि शिवसेना शिंदे गट विरोधकांनी या सभेवर टीकाटिप्पणी करणे सुरु केले आहे.
आता महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. याच दरम्यान हा पंतप्रधानांचा कार्यक्रम आयोजित झाल्यामुळे महापालिका निवडणुकांची ही प्रचारसभा म्हणूनच या सभेकडे बघितले जाते आहे. त्यामुळेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी महापालिका जिंकण्यासाठी पंतप्रधान आणावा लागतो का? अशी टीका केली आहे तर राष्ट्रवाडो काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही पंतप्रधानांना बोलावतील असा टोला लगावला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गटाराच्या लोकार्पणाला पंतप्रधांना बोलावले अशी टीका केली आहे. तर रोहित पवार यांनी पांनतप्रधानांचे भाषण ऐकून समुद्राचे खरे पाणीही गोड झाले असेल अशी टिप्पणी केली आहे.
एकूणच सर्वांनी आपापल्या बुद्धीनुसार तारे तोडले आहेत. मात्र ते हे विसरतात की जी कामे मुंबईत केली गेली, त्याचे मूल्यं आणि त्याची मुंबईसाठी असलेली उपयुक्तता ही देखील तितकीच महत्वाची आहे. ही उपयुक्तता बघता पंतप्रधानांनी हे लोकार्पण करणे उचित ठरते.
आपल्या देशात सध्या राजकारणाने पातळी सोडली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विरोधकांवर टीका करण्यासाठी काहीतरी मर्यादा हवी, ती मर्यादा सध्या कुणीच पळत नाही त्यामुळेच, अश्या प्रकारची टीकाटिप्पणी होते.

मात्र हे करतांना अनेकदा जनता आपल्याला हसते आहे, हे सर्वच राजकारणी विसरतात. त्यामुळे मग अश्या राजकारणाची टिंगलटवाळी होते आणि मग नागरिकांचा राजकारण्यांवरही विश्वास उडतो. याची जाणीव राजकारण्यांनी ठेऊन आपले वर्तन सुधारले पाहिजे. अन्यथा हे वर्तन लोकशाहीसाठी धोकादायक ठरेल याची जाणीव ठेवावी.

अविनाश पाठक

Leave a Reply