नवी दिल्ली : १ जानेवारी – हरियाणाचे क्रीडा मंत्री आणि माजी हॉकीपटू संदीप सिंह यांच्या विरोधात एका महिला कोचने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर FIR दाखल करण्यात आली आहे. चंदीगढच्या सेक्टर २६ पोलीस ठाण्यात क्रीडा मंत्र्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संदीप सिंह यांच्या विरोधात महिला कोचच्या तक्रारीनंतर आयपीसी कलम ३५४, ३५४ अ, ३५४ ब, ३४२ आणि ५०६ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात एका ज्युनियर महिला कोचने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यानंतर DGP नीं एसआटी स्थापन केली आहे. यामध्ये आयपीएस ममता सिंह आणि समर प्रताप सिंह आणि एचपीसी राजकुमार कौशिक यांचा समावेश आहे. ज्या ज्युनिअर महिला कोचने क्रीडा मंत्र्यांवर आरोप केले आहेत त्या आरोपांची बारकाईने चौकशी करा आणि चौकशी पूर्ण झाल्यावर अहवाल सादर करा असं एसआयटीला सांगण्यात आलं आहे.
हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्यावर ज्युनिअर कोचने आरोप केला आहे की संदीप सिंह यांनी तिला ऑफिसमध्ये बोलावलं त्यानंतर माझं लैंगिक शोषण केलं. मी जेव्हा ही बाब मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्या कानावर घातली तेव्हा त्यांनी माझी काहीही मदत केली नाही. या आरोपानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. खट्टर सरकारकडे त्यांनी संदीप सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हरियाणाचे क्रीडा मंत्री आणि माजी हॉकीपटू संदीप सिंह यांच्यावर लेडी कोचने एकच नाही तर अनेक गंभीर आरोप केले आहेत.संदीप सिंह यांनी मला इंस्टाग्रामद्वारे संपर्क केला. त्यांनी माझ्याशी व्हॅनिश मोडवरून संपरक् केला होता. कारण आम्ही जे चॅट केलं होतं ते सगळं डिलिट झालं. संदीप सिंह यांनी मला त्यानंतर आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावलं. काही डॉक्युमेंट्समध्ये तुझं नाव आल्याचं मला सांगितलं आणि त्यानंतर माझ्याशी छेडछाड केली.
पीडित महिलेने हेदेखील सांगितलं आहे की तू मला खुश ठेवलंस तर तुला हवी त्या ठिकाणी पोस्टिंग मिळेल आणि सगळ्या सोयी सुविधाही मिळतील. मात्र मी त्यांचं काहीही ऐकलं नाही. त्यानंतर माझी बदली करण्यात आली. मी जे ट्रेनिंग देत होते ते बंद करण्यात आलं. या प्रकरणी आता विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
माजी हॉकीपटू आणि क्रीडा मंत्री संदीप सिंह यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जातं आहे. जी पीडित महिला मला भेटल्याचा दावा करते आहे तिला मी कधीही भेटलेलो नाही. त्यामुळे माझ्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत असंही संदीप सिंह यांनी म्हटलं आहे.