नवी दिल्ली : ३० डिसेंबर – भाजप आमदार अभय वर्मा यांनी दिल्ली महानगरपालिकेतील सफाई कामगाराला मारहाण केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या आमदारानं केलाय.
अभय वर्मांनी सफाई कामगाराच्या कानशिलात लागवल्याचा आरोप ‘आप’नं केला असून या घटनेचा व्हिडिओ आपचे आमदार कुलदीप कुमार यांनी ट्विटरवर शेअर केलाय. यात भाजप आमदार एका व्यक्तीला कानशिलात लगावत शिवीगाळ करत असल्याचं दिसतंय.
याचा व्हिडिओ शेअर करत आमदार कुमार यांनी ट्विट केलंय की, ‘लक्ष्मीनगरचे आमदार अभय वर्मांनी दिल्ली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केलं. भाजपच्या या गुंडगिरीविरोधात आता सर्वांनी एकत्र यायला हवं. भाजपनं दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीतील पराभवाचा राग सफाई कर्मचाऱ्यांवर काढला, त्यामुळं दलित समाजात संतापाचं वातावरण आहे. भाजप द्वेषाचं राजकारण करत आहे.’
भाजप आमदार वर्मांनी सफाई कर्मचाऱ्याकडं सार्वजनिक शौचालयाला लागून असलेल्या खोलीची चावी मागितली, मात्र हा सफाई कामगार खोलीची चावी देऊ शकला नाही. याचा राग आल्यामुळं भाजप आमदारानं कामगाराच्या कानाखाली मारली आणि शिवीगाळही केली. हा व्हिडिओ व्हायरल होताच ‘आप’नं भाजपवर निशाणा साधायला सुरुवात केलीये.