हा क्षण माझ्यासाठी फक्त स्वप्नपूर्तीचा नाही, तर अभिमानाचा, गर्वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : ११ डिसेंबर – गेल्या अनेक महिन्यांपासून उद्घाटनाचे मुहूर्त चुकवणाऱ्या समृद्धी महामार्गाचं आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन झालं असून पुढील वर्षभरात दुसऱ्या टप्प्याचंही लोकार्पण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी आपल्या भाषणात दिली. उद्घाटनाच्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदेंनी या महामार्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सहकार्याची माहिती दिली. मात्र, त्याचवेळी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी प्रकल्प होऊ नये, यासाठी प्रयत्न केल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.
“मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचंही आज भूमिपूजन झालंय. आणखी काही कार्यक्रम होत आहेत. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा हा क्षण माझ्यासाठी फक्त स्वप्नपूर्तीचा नाही, तर अभिमानाचा, गर्वाचा आहे. अभिमान यासाठी की या कार्यक्रमाला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. आनंद याचा आहे की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं. आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघं एकत्र असताना पंतप्रधानांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय. या महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव आम्ही दिलंय याचाही मोठा आनंद आहे”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनेक बैठका झाल्याचं सूचक विधान केलं. “आज मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. आमच्याच कारकिर्दीत या महामार्गाचं लोकार्पण होत आहे. यात खूप अडचणी आल्या. जमीन अधिग्रहणाला खूप विरोध झाला. लोकांना विरोध करायला लावला. हा प्रकल्प होऊ नये, जमिनी दिल्या जाऊ नयेत म्हणून बैठका झाल्या”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे तोंडसुख घेतल्याचं बोललं जात आहे. त्यांच्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या भाषणातही आधीच्या सरकारने जमिनी देऊ नका म्हणून प्रयत्न केल्याचा उल्लेख केला होता.
“अनेक लोकांनी प्रयत्न केले. पण मी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यावर कुशलपूर्वक सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं. इतिहासात असं दुर्मिळ असतं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रकल्पावर काम करणारे सगळे लोक सोबत होते. शेतकऱ्यांना वाटलं की त्यांचे पैसे मिळतील की नाही. पण आम्ही आरटीजीएसच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. याला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला. त्यामुळे जमीन अधिग्रहण हा सगळ्यात मोठा टप्पा विक्रमी वेळेत पूर्ण केला”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, शिर्डी ते मुंबई या दुसऱ्या टप्प्याचंही लोकार्पण पुढच्या वर्षभरात होणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. “हा मार्ग शिर्डीपर्यंत पोहोचला आहे. पुढच्या ८-१० महिन्यांत तो मुंबईपर्यंत पोहोचणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणारा ठरणार आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला आपण अनेक प्रकारचे नवनगर वसणार आहोत. अनेक उद्योग तिथे येतील. लाखो लोकांना रोजगार देणारा समृद्धी महामार्ग ठरेल”, असं ते म्हणाले.

Leave a Reply