संपादकीय संवाद – राहुल गांधींच्या सावरकरविरोधी वक्तव्याचे दुष्परिणाम काँग्रेसला महाराष्ट्रात तरी भोगावे लागणार

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेली टीका सध्या प्रचंड गाजते आहे. या टीकेमुळे महाराष्ट्रात गेल्या २ दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, आज राहुल गांधी विदर्भात शेगाव येथे एका जाहीर सभेला संभोधित करणार आहेत, यावेळी राहुल गांधींचा जाहीर सभेतच निषेध करण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निश्चित केले आहे. त्याकरिता अनेक मनसे कार्यकर्ते शेगावच्या दिशेने निघाले, मात्र त्या सर्वांना बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरच पोलिसांनी अडवल्याच्या बातम्या येत आहेत. तरीही काही कार्यकर्ते सभास्थानी जाऊन गोंधळ घालतीलाच असे बोलले जात आहे. हे बघता वातावरण केव्हाही भडकू शकते अशी चिन्ह दिसत आहेत.
मुळात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात महाराष्ट्रात बोलणे टाळायला हवे होते, त्यांची भारत जोडो यात्रा केरळपासून निघाल्यावर यात्रेला चांगले जनसमर्थन लाभायला सुरुवात झाली होती, असा कोणताही वाद निर्माण न होता, ही यात्रा पूर्ण झाली असती, तर या यात्रेचा काँग्रेसला निश्चितच फायदा झाला आता. ही यात्रा जनसमर्थन मतात परिवर्तित करू शकेल काय? असा प्रश्न विचारला जात होता. आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद बघता काही प्रमाणात फायदा निश्चित झाला असता, मात्र महाराष्ट्रातील त्यांच्या वक्तव्यामुळे जे वातावरण तापले त्यामुळे आतापर्यंत निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणावर पाणी फेरले जाईल की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे या देशातील स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या क्रांतिकारकांचे अग्रणी म्हणून ओळखले जात होते, दुर्दैवाने त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय हालचालींवर बंधने आली. परिणामी राष्ट्रीय स्तरावर ते नेते म्हणून पुढे येऊ शकले नाही, असे असले तरी महाराष्ट्रात आजही सावरकरांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. विशेष म्हणजे ते जसे क्रांतिकारक होते तसेच एक साहित्यिकही होते, त्यामुळे त्यांचे साहित्य महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आणि त्यांच्या मृत्यूनंतर ५६ वर्षांनीही ते साहित्य चिरंतन म्हणून ओळखले गेले आहे. त्यामुळेच मराठी जनमानसात सावरकरांचे स्थान कायम वादादीत राहिले आहे.
अश्या परिस्थितीत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या विरोधात केलेले वक्तव्य त्यांच्या काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात तरी अडचणीचे जाणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत मागणी पुढे आली होती, त्यावेळी काँग्रेसने या मागणीला कडाडून विरोध केला हा विरोध काँग्रेसला अत्यंत महागात पडला परिणामी आधी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असलेली काँग्रेस २०१४च्या विधानसभा निवडणुकीत चवथ्या क्रमांकावर फेकली गेली. अजूनही काँग्रेस आपली परिस्थिती सुधारू शकलेली नाही.
राहुल गांधी यांच्या सावरकर विषयक विधानामुळे काय नुकसान होऊ शकते याची जाणीव काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना निश्चितच आहे, त्यातच राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काँग्रेस विरोधकांनी आगीत तेल ओतण्याचा उद्योग सुरूच ठेवला आहे. राहुल गांधींच्या आजी माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी १९८० साली सावरकरांचे गौरव करणारे लिहिलेले पत्र सध्या भाजप नेते आशिष शेलार वाचून दाखवत आहेत, त्यामुळे काँग्रेसवाल्यांची अधिकच अडचण होत आहे. मात्र राहुल गांधींसमोर स्पष्ट बोलण्याची हिम्मत एकातही नाही. परिणामी सर्वच नेते तोंड दाबून बुक्क्यांचा मर सहन करत आहेत.
एकूणच राहुल गांधींच्या सावरकरविरोधी वक्तव्याचे दुष्परिणाम काँग्रेसला महाराष्ट्रात तरी भोगावे लागणार हे आता स्पष्ट दिसते आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply