नागपूर : १३ ऑक्टोबर – कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंजाची, मशाल आणि घड्याळाची काळजी करावी, ढाल तलवार सोबत आम्ही आहोत. या महाविकास आघाडीला भविष्यात उमेदवार सुद्धा मिळणार नाही, अशी अवस्था आम्ही यांची करू, अशा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आता आमची युती आहे. त्यामुळे जेवढी ताकद आम्ही आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी लावू त्यापेक्षा दहा पट जास्त ताकत शिंदे गटाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी लावू, आम्ही पूर्णपणे शिंदे गटाच्या पाठीशी उभे आहोत, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वातल्या शिवसेनेसोबत युती करून पंचायत समितीपासून लोकसभेपर्यंत सर्व ठिकाणी युतीत निवडणूक लढवू. 45 लोकसभेच्या आणि 200 विधानसभेच्या जागा जिंकू. शिंदे गटाच्या आमदारांना मिळाळेल्या सुरक्षेवर बोलताना ते म्हणाले. शिंदे गटाचे आमदारांना मिळालेली सुरक्षा प्रशासनिक समितीच्या अहवालानुसार मिळाली असेल. राज्यातील कुठल्या व्यक्तीच्या जीविताला धोका असेल, तर त्यालाही अशाच पद्धतीने सुरक्षा पुरवली जाऊ शकते. आमदाराला मिळालेल सुरक्षा प्रशासनिक निर्णय असावा असेही यावेळी ते म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोदी नावाची कॅसेट वाजवतात. राहुल गांधीच्या नजरेत येण्यासाठी आपले प्रदेशाध्यक्ष पद वाचवण्यासाठी ते असे करतात. प्रत्येक माणसाने आपली क्षमता किंवा औकात ओळखली पाहिजे. मोदींसमोर नाना पटोलेची काय क्षमता आहे. मागील 2 महिन्यात नाना पटोले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत आम्ही नाना पटोले यांना पराभूत करू, असा दावाही बावनकुळे यांनी केला.
आधीचे सरकार झोपा काढणारे
एकनाथ शिंदे हे या आधीच्या सरकारला लाथ मारून आले होते. अन्यायाच्या विरोधात त्यांनी आवाज उचलला होता म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. का आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार नाही? आज 18-18 तास काम करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे. आधीचे 18 तास झोपणारे सरकार चांगले की, आत्ताचे सरकार चांगले, हे जनतेला विचारा असेही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.