अहमदाबाद : ११ सप्टेंबर – ‘‘भारतास नावीन्यपूर्ण संशोधनाचे वैश्विक केंद्र बनवण्यासाठी समन्वयातून प्रयत्न करणे गरजेचे असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आधुनिक धोरणांची राज्यांनी निर्मिती करावी,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी केले. अहमदाबाद येथे आयोजित केंद्र-राज्य विज्ञान संमेलनात ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.
मोदी म्हणाले, की पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारत आपल्या शास्त्रज्ञ-संशोधकांच्या योगदानास पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यात अपयशी ठरला आहे. परिणामी समाजातील एक मोठा घटक विज्ञानाविषयी उदासीन राहिला. भारतीय शास्त्रज्ञांच्या योगदान आणि यशाला प्रोत्साहन देण्याची नितांत गरजेचे आहे. २०१४ नंतर विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीत वाढ झाली आहे. ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय संशोधन’ या मंत्रानुसार भारताची सध्याची वाटचाल सुरू आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या या ‘अमृतकाळा’त भारतास संशोधन आणि नावीन्याचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी विविध स्तरांवर एकजुटीने काम करण्याची गरज आहे. आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनाचे लाभ स्थानिक पातळीवर पोहोचवणे गरजेचे आहे. सगळय़ा राज्यांनी आपल्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधणे, ही काळाची गरज आहे. विज्ञान, नावीन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानासाठी आधुनिक धोरणनिर्मिती करताना शास्त्रज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. नावीन्यपूर्ण संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारांनी जास्तीत जास्त वैज्ञानिक संस्था स्थापन कराव्यात. उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये नावीन्यपूर्ण संशोधनासाठीच्या प्रयोगशाळांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे भारताचा नवसंशोधनांचा निर्देशांक ४६ झाला आहे. हा निर्देशांक २०१५ मध्ये ८१ होता. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यावेळी उपस्थित होते.