चंद्रपूर : २६ ऑगस्ट – सावली गावालगत आसोलामेंढा नहरात अंघोळीसाठी गेलेली पाच मुले पाण्यात बुडाली. यातील चौघांना वाचविण्यात यश आले तर काजल अंकुश मक्केवार नहरात वाहून गेल्याने तिचा शोध सुरू आहे. सावली गावाला लागून असलेल्या असोलामेंढा नहर येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईसोबत रोहित अनिल मेडपल्लीवार (वर्ग ७ ) आणि अमित अनिल मेडपल्लीवार ( वर्ग ५) यांच्यासह राहुल अंकुश मक्केवार (वर्ग ४), सुश्मिता अंकुश मक्केवार (वर्ग ८) व कु. काजल अंकुश मक्केवार (वर्ग ५) ही पाच मुले गेली होती.
यावेळी पाचही जण नहरात अंघोळीसाठी उतरले. दरम्यान, पाचही मुले पाण्यात बुडू लागली. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून तेथून जवळच असलेल्या शासकीय धान्य भांडारमधील कामगार बालू भंडारे यांनी तेथे धाव घेत नहरात उडी घेतली. भंडारे यांना चौघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, काजल वाहून गेली. घटनेची माहिती सावलीचे ठाणेदार आशीष बोरकर यांना देण्यात आली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत आपल्या चमूसह मुलीचा शोध सुरू केला.