गोंदिया : १८ ऑगस्ट – धावत्या रेल्वेतून उतरू नये, धावत्या रेल्वेत चढणे धोकादायक आहे’, असे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार प्रवाशांना सुचविले जाते. मात्र, प्रवासी नको ते धाडस करून स्वत:चाच जीव धोक्यात घालतात. अशीच एक घटना गोंदिया रेल्वे स्थानकावर घडली. चुकीच्या रेल्वेत चढल्याचे लक्षात आल्यावर एका तरुणीने धावत्या रेल्वेतून फलाटावर उडी घेतली. फलाटावर कोसळल्यानंतर ती रेल्वेखाली खेचल्या जात होती. अशातच, तेथे कर्तव्यावर असलेला रेल्वे सुरक्षा दलाचा जवान देवदुताप्रमाणे धावून आला. त्याने तरुणीला बाहेर खेचत तिचे प्राण वाचविले.
१७ ऑगस्ट रोजी गोंदिया रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे समता एक्स्प्रेस आली. रात्री ११.५५ मिनिटांनी ती पुढील प्रवासासाठी रवाना झाली. या रेल्वेगाडीत एका तरुणीने घाईघाईने प्रवेश केला. मात्र, आपण चुकीच्या गाडीत चढल्याचे तिच्या लक्षात आले. तिने मागचा पुढचा विचार न करता धावत्या रेल्वेतून फलाटावर उडी घेतली. फलाटावर कोसळताच ती रेल्वेखाली ओढल्या जात होती.
हे पाहताच तेथे कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचा जवान प्रमोद कुमार याने क्षणाचाही विलंब न करता आपला जीव धोक्यात घालून तरुणीला बाजूला खेचले. हा संपूर्ण थरार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपल्या गेला. प्रमोद कुमार यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तरुणीचा जीव अगदी थोडक्यात वाचला. प्रमोद कुमार या तरुणीसाठी देवदूतच ठरले. या धाडसी कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.