नागपूर : ८ ऑगस्ट – नागपुरमध्ये काल (रविवार) रात्रीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. गेले काही दिवस पावसाने उसंत घेतली होती. शहरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या, पण काल रात्रीपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
शहरातील रस्ते ओलेचिंब झाले असून रस्त्यावर पाणी साचले आहे. येत्या १३ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची भीती आहे. दरम्यान, मौदा तालुक्यातील तारसा ग्राम पंचायत परिसरातून वाहणाऱ्या सांड नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे.
जुलै महिन्यात नागपूरसह संपूर्ण विदर्भाला अतिवृष्टीचा सामना करावा लागला. अतिवृष्टीमुळे चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, गोंदिया आदी जिल्ह्यांना पुराचा फटका बसला.