मुंबई : २१ जुलै – “आम्ही शिवसेनेच्या खासदार- आमदारांवर अंधविश्वास ठेवला. तर त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती. आयुष्यभर त्यांच्या कपाळावर गद्दाराचा ठपका असेल”, अशी टीका शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. भिवंडीत आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हजारो शिवसैनिकांशी संवाद साधला.
४० पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी करत भाजपाशी हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार घटनाबाह्य असून ते लवकरच कोसळणार असल्याचा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला आहे. तसेच बंडखोर आमदारांकडून आम्ही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उठाव केला, बंड केला अशी वाक्ये सतत वापरण्यात येत आहेत मात्र, मुळात हा बंडच नसून गद्दारी आहे आणि ही केवळ राजकीय गद्दारी नसून माणूसकीशी केलेली गद्दारी असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरें जेव्हा करोनामुळे रुग्णालयात दाखल होते. त्यावेळेस त्यांच्यावर दोन शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून या बंडखोरीची योजना बनवली जात होती. एवढचं नाही तर पुढचा मुख्यमंत्री कोणाला बनवता येईल याबाबतही चर्चा सुरु असल्याचा आरोप आदित्य यांनी केला आहे. शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे यांना हलचाल कऱण्यातही त्रास होतोय हे माहिती असूनही गद्दारी करण्याचं धाडस बंडखोर आमदारांनी केली असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.