अमरावतीत गेल्या २४ तासांत ७ तालुक्यांत अतिवृष्टीचे नोंद, चारगड नदीवरील पूल गेला वाहून

अमरावती : १८ जुलै – अमरावती जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून गेल्या चोवीस तासांत सात तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने चारगड नदीला पूर आला आहे. या पुरामुळे राज्य महामार्ग क्रमांक ३६५ वरील चारगड नदीवरील पूल वाहून गेला.
एक वर्षांपासून या नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून निर्माणाधिन पुलाच्या बाजूला असलेला वाहतुकीचा पूल मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे वाहून गेला. यामुळे परतवाडा ते घाटलाडकीमार्गे मोर्शी हा रस्ता वाहतुकीकरिता बंद झाला आहे.
दरम्यान, अप्पर वर्धा धरणाची सर्व १३ दारे १५० सेंटीमीटरने उघडण्यात आली आहेत. धरणातून सध्या ३ हजार १५० घन मीटर प्रतिसेकंद विसर्ग (क्युसेक) सुरू आहे. याशिवाय पूर्णा प्रकल्पाची ९ दारे ५० से.मी. उघडण्यात आली असून १३६ क्यूसेक विसर्ग सुरु आहे. शहानूर, सपन, पाक नदी प्रकल्पातूनदेखील पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. धारणी, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, अमरावती, चांदूर बाजार या तालुक्यात अतिृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात चोवीस तासात ५७.५ मिमी पाऊस झाला.

Leave a Reply