यवतमाळमध्ये शिवसेना समर्थक आक्रमक, संजय राठोडांना दिली धमकी

यवतमाळ : २८ जून – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेच ढग निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार सोबत आले आहे. यात माजी वनमंत्री संजय राठोड यांचाही समावेश आहे. आता शिवसैनिकांनीच संजय राठोड यांच्याविरोधात पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे सादर करण्याची धमकी दिली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. अलीकडे संजय राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात घरवापसी करणार अशी चर्चा रंगली होती. पण, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि संजय राठोड गुवाहाटीमध्ये दाखल झाले. त्यामुळे आजपर्यंत संजय राठोड यांचं समर्थन करणारे शिवसैनिक कमालीचे संतापले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याने त्यांचे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातले पुरावे समोर आणू, या प्रकरणातली 56 मिनिटांची एक सीडी आपल्याकडे असून, बंजारा समाजाची मुलगी त्याने कशी मारली हे त्यातून उघड होईल असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे.

Leave a Reply