नवी दिल्ली : ६ जून – प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांनी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी अरब देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला आहे. कतार, कुवेत आणि इराणनंतर आता सौदी अरेबियानेही नाराजी जाहीर केली आहे. सौदी अरेबियाने भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसंच भाजपाने केलेल्या कारवाईचं स्वागतही केलं आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने श्रद्धा आणि धर्मांचा आदर करावा असं सांगता देशाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.
एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील वादचर्चेत भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. दिल्ली भाजपचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनीही प्रेषितांबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप असून, पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. नुपूर शर्मा यांना पक्षाने निलंबित केलं आहे.
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणताही हिंसाचाराला विरोध करण्यासंबंधी तसंच इस्लामिक चिन्हं आणि सर्व धर्मांच्या महत्त्वाच्या व्यक्तींचा आदर करण्यासंबंधीच्या आपल्या भूमिकेवर जोर दिला.
इराण, कतार आणि कुवेत या देशांनी तेथील भारतीय दूतावासांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केलं आहे. अरब देशांमध्ये ट्वीटरवर ‘‘भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाका’’, असा हॅशटॅग चालवण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. कतारने तेथील भारतीय राजदूतांना पाचारण करून नुपूर शर्मा यांच्या टिप्पणीबद्दल एका निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवला.
कतारच्या परराष्ट् विभागाने रविवारी सांगितलं की, “भारतात भाजपा नेत्यांकडून प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल विचारणा करण्यासाठी आम्ही भारताचे राजदूत दीपक मित्तल यांना पाचारण केलं होतं. या पूर्णत: अस्वीकारार्ह, निषेधार्ह विधानाबाबत आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे. धार्मिक व्यक्तीमत्त्वांबाबत भारतातील काही व्यक्ती अवमानकारक वक्तव्यं करीत असल्याबद्दल त्यांच्याकडे आम्ही चिंता व्यक्त केली आहे”.
यावर भारतीय राजदूतांनी स्पष्ट केलं की, “ही विधाने कोणत्याही प्रकारे भारत सरकारचं मत नाही, तर ती काही दुय्यम घटकांचं मत आहे. भारतीय परंपरेनुसार भारत सरकार सर्वच धर्मपंथांचा सन्मान करते. अशा विधानांबाबत संबंधितांवर कारवाईचे आश्वासनही त्यांनी दिलं”.
दरम्यान, सर्व धर्माबद्दल पक्षाला आदर असून, कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अवमान करणं पक्षाला मान्य नाही, असं स्पष्टीकरण भाजपने रविवारी दिले.