बकुळीची फुलं : भाग २५ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

लग्न अचानक ठरलं. खरं तर मनातला आनंद सांगता येत नव्हता . कितीही ठरवलं तरी पैशाची जुळवणी करणं अत्यंत कठीण होतं. माझ्या दागिन्यांची काळजी नव्हती , कारण ते नव्हतेच . आईजवळ ही नव्हते . आणि मुलाला अंगठी घेणं ही कठीण झालं होतं . त्यावेळी सोनं होतं २५० रू तोळा . अर्ध्या तोळ्याची अंगठी कशी घेतली हा प्रश्नच होता.
नातेवाईक नसल्याने कुणी पाहुणे येणार नव्हते . नागपूरला असणारे पाच पंचवीस लोक येणार होते .
लग्नासाठी हॉल घेणं परवडणारं नव्हतं . . शेवटी टिळक पुतळ्या जवळच्या राम मंदिरात लग्न करायचं ठरलं . ठराविक पद्धतीच्या पंचवीस पत्रिका आणल्या. त्यातली एक देवासमोर ठेवली . विघ्नहर्त्यांचे कुठलंही विघ्न येणार नाही अशीच व्यवस्था केली होती .
मुलाकडे पंचवीस तीस , आमच्याकडचे साधारण तेवढेच . माझ्यासाठी चार साड्या उधार आणल्या .सारंच जवळजवळ उधारी वर आणलं गेलं होतं .
मला वाईट वाटत होतं . आपल्यासाठी किती करावं लागतं याचं . चंद्रपूरला नुकतीच नोकरी लागलेला भाऊ पडायचं घेऊन आला होता . तर भाभा एटोमिक एनर्जी मधे असलेला भाऊ पाचशे रूपये घेऊन आला होता .. विश्वैशरैय्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असणा-या भावांनी आपल्या स्कॉलरशिप मधले काही पैसे दिले . . तरीही लग्न होऊन गल्लीतून दिल्लीला नविन संसार मांडायचा तर सारंच हवं होतं . ही अडचण ओळखून सासूबाई म्हणाल्या
” लग्न झाल्या झाल्या एकदम क्वार्टर मिळणार नाही. तोवर तू मलकापूर ला चल अनेकांच्या भेटी येतील मग काय राहील ते घेता येईल .”
केवढी सुटका केली होती त्यांनी अडचणीतून.
पण तशी वेळच आली नाही . माझं लग्न रेकॉर्ड ब्रेक झालं . ते असं .
माझ्या लग्नाची तारीख ठरली १५ मार्च. शाळेत परीक्षांचे वारे होते . विद्यार्थ्यांची रिव्हीजन चालू होती. तरीही माझ्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता होती तसंच मिलीटरीतल्या सैनिकाला पहायची सुद्धा.
एक दिवस मी टीचर्स रूम मधे सांगत होते .
” दिल्लीला जावं लागेल पण घरातलं कुठलंच सामान आज नाही . भांडी नाहीत की काही नाही.”
आलेल्या विद्यार्थिनीने ते ऐकलं असावं त्यांचा प्रत्यय पुढे आला .
लग्न सकाळी होतं आश्चर्य म्हणजे सर्व विद्यार्थिनी आवर्जुन आल्या होत्या .दुपारच्या वर्गाच्या ही आणि शिक्षिका ही हजर होत्या. संपूर्ण राममंदिर वरच्या गॅलरीसह भरलं . पाय ठेवायला जागा नव्हती. बाहेरही रांग लागली होती . सर्वांनी माझ्यासाठी ज्या भेट वस्तू आणल्या होत्या त्या यादी करून आणाव्यात तशा होत्या. अगदी चमच्या पासून तर ताटं , वाट्या, भांडीच नव्हेतर जेथे म्हणून हवं असतं घरात प्राथमिक सामान ते ते आणलं होतं .
विद्यार्थिनींचं माझ्यावरचं प्रेम पाहून माझे डोळे अखंड भरून येत होते.
तिकडे शाळेत दहा पंधरा विद्यार्थिनी उपस्थित होत्या. अकरा वाजता मुख्याध्यापिका आल्या , त्यांनी पाहीले . आणि बेल वाजवायला लावून शाळेला सुट्टी दिली .
माझ्या आयुष्यात मी कमावलं ते हेच असावं.असं कधी पूर्वी शाळेत झाल्याचं मी ऐकलं नव्हतं . एका शिक्षिकेच्या लग्नासाठी शाळा ओस पडू शकते हा अनन्य अनुभव होता .
त्यानंतर शाळेत नियम काढण्यात आला , “सुट्टी ची अगोदर परवानगी घ्यावी. “
माझं लग्न प्रचंड गर्दीत , धुमधडाक्यात झालं . त्यांचं संध्याकाळी मलकापूर ला जायचं होतं . रात्रीची गाडी पहाटे पोहचणार होती .
माझे मोठे दीर ,जाऊ आणि लहानसा पुतण्या .आणि आम्ही तिघं .
आईचा निरोप घेऊन रिक्षात बसले . अनावर झालं होतं . अखंड रडत होते पण माझ्या शेजारी बसलेले माझे पतिराज शब्दानेही बोलत नव्हते.
स्टेशनवर घरचे हिरे पोहोचवायला आले होते . सर्वांचा निरोप घेऊन मी एकटीच दूर मलकापूरला एकटीच अनोळखी घरी जाणार होते. खुप एकटं एकटं वाटतं होतं.सारेच माझ्यासाठी अनोळखी होते.
गाडीत बसलो . तेही समोरासमोर . मी अजून पर्यंत त्यांना नीट पाहिलं मी नव्हतं. पण आता गाडीच्या काचेच्या खिडकीत त्यांचा चेहरा दिसत होता .
तोच चेहरा आता माझा आधार होता . त्यांचं लक्षही नव्हतं .पण मला माझं भाग्य त्यात दिसत होतं .
गाडी वेगाने चालली होती . कदाचित जीवन पुढे गतीमान होण्याचा संकेत देत असावी .
आता माझेही डोळे मिटू लागले होते . पण खिडकीकडे त्यांनी एकदातरी पहावं म्हणून मी खिडकीकडे पहात होते .
पण नाहीच… नाहीच पाहिलं त्यांनी . मनातून वाटलं की , “ज्याच्या सोबत सारं घर दार सोडून निघाले तो असा अलिप्त कसा राहू शकतो ?
साधं पाहू ही नये ?”
विचार करता करता मला कधीतरी झोप लागली.
नविन गाव , नविन स्वप्नं , नवी माणसं सारं नवंच माझ्या स्वागतासाठी होतं.

शुभांगी भडभडे नागपूर

Leave a Reply