राज ठाकरे जोपर्यंत परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही – रावसाहेब दानवे

मुंबई : ४ एप्रिल – राज ठाकरेंचं गुढीपाडवा सभेतलं भाषण आणि नितीन गडकरींनी दिलेली राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दिलेली भेट, यानंतर मनसे आणि भाजपाची युती होईल, अशा चर्चा सुरू आहेत. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या युतींच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
“राज ठाकरे जोपर्यंत परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही,” असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. “आधी केवळ आम्हालाच वाटत होतं की शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, पण राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचा अंदाज घेतला तर आता घरातूनच आवाज उठायला लागला आहे. राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने चालले आहेत. माझी आणि राज ठाकरे यांची लवकरच भेट होणार आहे. पण ती वेगळ्या विषयावर होणार असून ही भेट राजकीय असणार नाही,” असं रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, राज्यातील मंत्र्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरही रावसाहेब दानवेंनी भाष्य केलं. “ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत. तक्रार आल्यावरच त्या कारवाई करतात. त्यामुळे तक्रार असेल तर कोणाचीही कारवाई होऊ शकते, त्यात घाबरण्याचं कारण काय?” असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केला. तर, राज ठाकरे जोपर्यंत परप्रांतियांबाबत त्यांची भूमिका बदलणार नाहीत, तोपर्यंत भाजपा मनसेची युती होणार नाही, हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलंय.

Leave a Reply