वर्धा : २८ मार्च – वर्धा जिल्ह्यातील वडनेर शिवारात एक थरारक घटना घडली आहे. येथील एका 40 वर्षीय शेतकऱ्याची शेतात घेऊन जात निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं संबंधित शेतकऱ्याला गोड बोलून शेतात घेऊन जात काटा काढला आहे. आरोपीनं बेसावध असणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याची दगडाने ठेचून हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हत्येचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
दिनेश मारोती महाजन असं हत्या झालेल्या 40 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते वर्धा जिल्ह्यातील वडनेर येथील रहिवासी होते. या हत्ये प्रकरणी पोलिसांनी गावातील अन्य 60 वर्षीय शेतकरी प्रमोद भाके याला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास केला असता, मृत दिनेश महाजन आणि आरोपी प्रमोद भाके यांच्यात शेतीच्या खरेदी विक्रीतून वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. याच वादातून आरोपीनं दिनेश महाजन यांची हत्या केल्याची माहिती उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश मारोती महाजन यांनी गावातील शेतकरी प्रमोद भाके यांचं पाच एकर शेत विकत घेण्याबाबत सौदा झाला होता. दिनेश यांनी शेत खरेदी करण्यासाठी मोठी रक्कमसुद्धा प्रमोद यांना दिली होती. मात्र, शेताची आराजी कमी असल्यानं दोघांमध्ये आर्थिक वाद उफाळून आला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात हा वाद सुरू होता.
घटनेच्या दिवशी आरोपी प्रमोद यानं मृत दिनेश यांना गोड बोलून दुचाकीने शेतात घेऊन गेला होता. वडनेर शिवारात गेल्यानंतर आरोपी प्रमोद याने बेसावध असलेल्या दिनेश यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. यानंतर पुढच्याच क्षणात आरोपीनं जवळच पडलेल्या दगडाने दिनेश यांच्या डोक्यात वार केला. दिनेश खाली पडताच आरोपीनं त्यांचं डोकं दगडाने ठेचलं. हा धक्कादायक प्रकार आसपासच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली. आरोपी प्रमोद भाके यानं स्वत:ला घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या हवाली केलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.