नागपूर : ८ फेब्रुवारी – गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने ५ लाख ७0 हजार रुपयांची मेफेड्रोन (एम.डी. ड्रग्स पावडर) ची मोठी खेप जप्त केली. या प्रकरणी पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यात महिलेचाही समावेश आहे. याप्रकरणी पथकाने तस्करीत वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह ड्रग्ज मिळून एकूण १५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपेठ हद्दीतील संत्रा मार्केटच्या शिवशक्ती रेस्टॉरंट अँण्ड भोजनालयासमोर रोडवर अंमली पदार्थाची मोठी खेप येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. प्राप्त माहितीची शहानिशा केल्यानंतर पथकाने सापळा रचला. आरोपी शिवशंकर चंद्रभान कांद्रीकर (वय ३४, रा. खडकाडी मोहल्ला, गोलीबार चौक), संगीता राजेंद्र महेश्वरी (वय ४१, रा. अयोध्यानगर, हुडकेश्वर), आकाश चंद्रकांत ढेकळे (वय ३७, रा. एम.आय.जी. कॉलनी, वकीलपेठ, रेशीमबाग चौक) यांना ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी आणि तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे ५ लाख ७0 हजार रुपयांची ५७ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी. ड्रग्स पावडर) आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी हा साठा जप्त केला. याव्यतिरिक्त पथकाने ३१ हजारांचे विविध कंपन्यांचे ४ मोबाईल, १0 लाख रुपयांची एम.एच. ४९/ बी.के. ३७९८ क्रमांकाची होंडा सिटी कार, नगदी १७ हजार रुपये असा एकूण १६ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये पोलिसांनी सर्व माल जप्त करून आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्यांना १0 फेब्रुवारीपयर्ंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सुनील फुलारी यांच्या निर्देशान्वये पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) डॉ. अक्षय शिंदे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज सिडाम, सपोनि सूरज सुरोशे आदींनी पार पाडली.