धनबाद : २७ जानेवरी – झारखंड-बिहार बंदचे आवाहन करत नक्षलवाद्यांनी रेल्वेला लक्ष्य केले आहे. धनबाद रेल्वे विभागातील चिचाकी आणि करमाबांध रेल्वे स्थानकांदरम्यान पोल क्रमांक 333/16 वर बॉम्बस्फोट घडवून नक्षलवाद्यांनी ट्रॅक उडून दिला. त्यामुळे हावडा आणि नवी दिल्ली रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नक्षलवाद्यांनी रेल्वे रुळ उडवल्याची माहिती मिळताच पूर्व मध्य रेल्वेच्या धनबाद रेल्वे विभागीय नियंत्रण कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. नवी दिल्ली-हावडा, नवी दिल्ली-राजधानी, नवी दिल्ली-भुवनेश्वर राजधानी वळवण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री १२.३० च्या सुमारास घडली. रेल्वे कंट्रोलला सकाळी १२.३४ या घटनेची माहिती मिळाली.
नक्षलवाद्यांच्या बंदमुळे रेल्वे अलर्ट मोडवर आहे. वेगावर नियंत्रण ठेवून गाड्या चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच विशेष खबरदारीही घेतली जात होती. कदाचित यामुळेच स्फोटामुळे ट्रेनचे नुकसान झाले नाही. गुरुवारी सकाळी रुळ दुरुस्त करून रेल्वेने पुन्हा वाहतूक सुरू केली. पहिली ट्रेन गया-धनबाद इंटरसिटी एक्स्प्रेस ही एमटी कोच करून चालवण्यात आली. सकाळी ७.२५ ला गोमो स्टेशनला पोहोचली. धनबाद-गया दरम्यान हावडा-नवी दिल्ली मार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे ७ तास विस्कळीत झाली होती.