सध्या आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही केले तरी त्यांच्यावर टीकास्त्र सोडायचे, असा विचार करणारा एक वर्ग तयार झाला आहे. जे काही केले तर बरोबर की चूक याचा विचार न करताच हा विरोध केला जात असतो. त्यामुळे देशात कारण नसताना अकारण नवे वाद निर्माण होतात.
दिल्लीत स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन व्हाइसरॉयच्या निवासस्थानापासून जाणाऱ्या रस्त्यावर एक भव्य स्मारक उभारले होते, ते स्मारक इंग्लंडचे तत्कालीन राजे भारतात आले असताना त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले होते. १९७१ च्या बांगलादेश युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्या स्मारकाचे रूपांतर अमर जवानांचे स्मारक म्हणून केले, आणि तिथे एक ज्योत सतत तेवती राहील, अशी व्यवस्था केली मात्र हे स्मारक प्रतीकात्मक होते. आतापर्यंत विविध युद्धांमध्ये शहीद झालेल्या जवानांची तिथे काहीही नोंद नव्हती. अश्या सर्व शाहिद जवानांची नोंद घेणारे एक स्मारक राजधानीत असावे अशी लष्कराची मागणी होती. ही मागणी मोदी सरकारने मान्य केली आणि ही अमर जवान ज्योत जिथे तेवती होती तिथे जवळच आतापर्यंत शहीद झालेल्या जवानांचे एक भव्य स्मारक उभारण्यात आले, आणि तिथे सर्व जवानांची यादीही चित्रित केली.
या स्मारकताही एक ज्योत तेवती राहील अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे जिथे शहीद जवानांचे स्मारक तिथेच अमर जवान ज्योत असावी असा निर्णय प्रशासनाने घेतला आणि ही ज्योत शहीद स्मारकातच स्थानांतरित केली. या ज्योतीची रिक्त झालेली जी जागा होती, तिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयात तसे वावगे काहीच नाही. ही प्रशासनिक सोय म्हणून करण्यात आलेली व्यवस्था होती, मात्र देशातील जुना विरोधी पक्ष असलेला काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला आणि त्यावर आता राजकारण सुरु आहे. हा जवानांचा अपमान आहे असा आरोप तर केला जातो आहेच पण त्याचबरोबर इथे ज्योत स्वर्गीय इंदिरा गांधींनी प्रज्वलंत केली असल्यामुळे काँग्रेसवाल्यांच्या नाकाला जास्तच मिरच्या झोंबल्या आहेत. त्यावरून आता राजकारण सुरु आहे.
वस्तुतः जिथे सर्व शहीद जवानांची निंद्य घेत स्मारक उभारले गेले आहे, तिथेच ही ज्योत तेवती राहणे हे केव्हाही उचितच ठरते त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोसांचे स्मारक उभारणेही यथोचित ठरते. सुभाषचंद्र बोसांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान दिले होते. त्यांनी आजाद हिंद फौज उभी करून इंग्रजांशी युद्ध पुकारले होते. त्यांनी स्वतःला देशाचे पंतप्रधान घोषितही करून घेतले होते. त्यामुळे त्यांचे स्मारक सध्याच्या राष्ट्रपती भवनातून बाहेर निघणाऱ्या राजपथ या मार्गावर उभे होणे हे यथोचितच ठरते, खरे तर हे काम फार पूर्वी व्हयला हवे होते, तर नेहरू आणि गांधी परिवाराला कामोठे करण्याच्या नादात ते झाले नाही. आता मोदी सरकार करते आहे, तर त्याला विरोध का करायचा?
मात्र आम्हाला कसेही करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधच करायचा आहे, असे काँग्रेसवाल्यांनी ठरवून टाकले आहे. त्यामुळे कोणतेही कारण शोधायचे आणि विरोध करायचा हा कार्यक्रम सुरु आहे.
अश्या विरोधाकरिता केलेल्या विरोधामुळे तुम्हाला तात्पुरती प्रसिद्धी मिळेलही मात्र चिरकाल तुम्ही जनमानसात स्थान निर्माण करू शकणार नाही, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा ४५० वरून तुम्ही ५० वर आलात असेच करत राहिलात तर ५ वर यायला वेळ लागणार नाही, त्यामुळे ही निरर्थक ओरड काँग्रेसने थांबवायलाच हवी.
अविनाश पाठक