नागपूर : १८ जानेवारी – नागपूर शहरासह पूर्व विदर्भात कोरोनाची तिसरी लाट दररोज नवे उचांक गाठत आहे. या लाटेची तीव्रता चांगलीच वाढली असून रुग्णसंख्येत होणारी वाढ लाटेची तीव्रता व्यक्त करीत आहे. मागील आठवड्यापासून २ हजारांच्या घरात गेलेली रुग्णसंख्या आज ३ हजारांच्या पुढे गेली आहे, सोबतच शहरात आज ५ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात नागपूर जिल्ह्यात ३२९६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरात सुरु झालेले निर्बंधही कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यात अयशस्वी ठरत आहेत. गेल्या २४ तासात शहरात ३२९६ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता ५१७२२६ वर पोहोचली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये ५२९ रुग्ण ग्रामीण भागातील, २६७६ शहरातील तर ९१ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत. आज शहरात ५ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, त्यातील ४ रुग्ण शहरातील तर एक जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहे. त्यामुळे एकूण कोना मृत्यूची संख्या आता १०१४१ वर पोहोचली आहे.
आज शहरात एकूण १२५८९ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील २९३४ चाचण्या ग्रामीण भागात तर ९६५५ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात १३४५ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४९०८४३ वर पोहोचली आहे तर कोरोना मुक्तीचे प्रमाण ९४.९० टक्क्यांवर गेले आहे. आज कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये २३६ रुग्ण ग्रामीण भागातील, १०५४ शहरातील तर ५५ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. शहरात सध्या १६२४२ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यातील २९३९ रुग्ण ग्रामीण भागातील तर १३१३३ शहरातील तर १७० जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत.