नियंत्रण सुटून दुचाकी झाडाला धडकल्याने २१ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

गडचिरोली : ७ जानेवारी – वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी झाडाला धडकल्याने २१ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. विप्लब बिमल रॉय रा. देशबंधग्राम तालुका मुलचेरा जिल्हा गडचिरोली असे मृतक युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर युवक गुरुवारी ६ जानेवारी रोजी एपी -२८ डिक्यू ५९६० या क्रमांकाच्या दुचाकीने मुलचेरा तालुक्यातील देशबंधु ग्राम येथून घोटकडे आपल्या आजोबांना आणण्यासाठी जात असताना वाहनवरील नियंत्रण सुटल्याने वाहन झाडाला धडकला आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे सदर युवक तेलंगाणा राज्यातील हैदराबाद येथे मोलमजुरी करायचा. ६ जानेवारी गुरुवारीच तो आपल्या घरी देशबंधु ग्राम येथे आला. आपल्या आजोबांना घ्यायला तो घोटकडे जात असतानाच ही घटना घडली.
घरचा कमावता जवान मुलगा गेल्याने रॉय परिवारावर संकट कोसळले. सदर घटनेची माहिती मिळताच मुलचेराचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या युवकाचे शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले. पुढील तपास मुलचेराचे ठाणेदार प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पडतरे करीत आहेत.

Leave a Reply