नागपूर : ३० डिसेंबर – भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धुसाळा येथील नयन परमेश्वर पुंडे या बारा वर्षीय बालकाचा वीज कोसळून मृ्त्यू झाला. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात सातरगाव शिवारात अंगावर वीज पडून रवींद्रसिंग चव्हाण (वय ३०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तसेच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथे वीज पडून गजानन बापूराव मेंढे (वय ४२) शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
पूर्व विदर्भात गारपिटीचा फटका
चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीमध्ये बुधवारी दुसऱ्या दिवशीही गारपीट झाली. नागपूर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यात पावसाची नोंद झाली. ठिकठिकाणी गारा पडल्याचं दिसून आलं. या गारपिटीचा फटका भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याला जास्त बसला. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातही पावसासह काही ठिकाणी गारपीट पडली. गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी पहाटे अवकाळी पावसानं हजेरी लावली. दुपारी चामोर्शी, कोरची तालुक्यासह काही ठिकाणी गारपीट झाली.
चंद्रपूरमध्ये पहाटे अवकाळी पावसाने चांगलेच झोपडले. ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ४१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गडचिरोलीत २७ मिमी, गोंदियात १४.२ मिमी पावसाची नोंद झाली. किमान तापमान आणखी खाली घसरण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. नव्या वर्षाची सुरुवात थंडीच्या लाटेने होण्याची शक्यता आहे.