मुंबई : १९ डिसेंबर – राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी राज्य सरकारवर देखील टीका केली.
“बाळासाहेब थोरात हे सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्री आहेत, तेव्हा त्यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांची सुख-दु:ख, समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. पण हे सत्तेच्या नादात इतके मशगुल आहेत की त्यांना गरीब कामगारांकडे पाहायला वेळ नाही. कष्टकरी जनताच सत्तेवर बसवते, तेव्हा त्यांचा शिव्या-शाप लागल्या तर सत्तेवरुन खाली यायला देखील वेळ लागणार नाही.” असं दरेकर म्हणाले आहेत.
तसेच, “ गेंड्याच्या कातडीच हे सरकार आहे, यांच्यात संवेदना उरलेल्या नाहीत. दीड-दोन महिने होऊनही सरकार कर्मचाऱ्यांबाबत कुठलाच सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही. जर केंद्र सरकार कुठलाही प्रतिष्ठेचा विषय न करता शेतकऱ्यांसाठी चार पावले मागे येऊन कृषी कायदा रद्द करु शकत असेल, तर मग तुम्हांला कुठला अभिमान आलाय?” असा सवाल करत प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर यावेळी टीका केली.
याचबरोबर, “ तुम्हाला दबावाने एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडता येणार नाही. तुम्हाला कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा लागेल. वाटल्यास चर्चा करा, समन्वय साधा. परंतु या कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाचा प्रश्न मार्गी लावा. सगळे कर्मचारी आज एकजुटीने लढत आहेत. खोट्या बातम्या पेरायच्या दहा हजार कर्मचारी आले, २० हजार कामावर गेले. मी आज मुंबई, पुण्यापासून सगळ्या रस्त्यांवर एसटी कुठे दिसते का हे पाहत होतो. एकही एसटी कुठे दिसली नाही. मग हे कर्मचारी कुठे कामावर जातात? भुलथापा मारायचं काम बंद करा. ” असंही दरेकर यांनी बोलून दाखलं.
आजपर्यंत ५२ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आणि मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत. एवढपण या सरकारला काहीच वाटत नसेल, तर यापेक्षा निर्दयी सरकार कधी पाहिलेलं नाही. एवढ्या क्रूरपणे सरकारने वागू नये. अजुनही वेळ गेलेली नाही कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाचा प्रश्न संवेदनशीलतेने हाताळावा आणि त्यांना न्याय द्यावा, अशी माझी मागणी राहील. अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मी ताकदीने मांडणार आहे.” असं यावेळी दरेकर यांनी माध्यमांना सांगितलं.