गोंदिया : २७ ऑक्टोबर – सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा टी पाईंट येथे नाकाबंदी करुन १२ लाख ४१ हजार ६७० रुपयांचा सुगंधीत तंबाखू व १० लाखाचा ट्रक असा एकूण २२,४१,६७० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई डुग्गीपार पोलिसांनी आज केली.
डुग्गीपार पोलिसांना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील कोहमारा-नवेगावबांध मार्गे सुगंधीत तंबाखूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार सचिन वागडे व त्यांच्या पथकाने कोहमारा टी-पाईंटवर नाकाबंदी केली. यादरम्यान ट्रक क्र.एमएच ४०, बीजी ३४४४ ची तपासणी केली असता २७ बॉक्समध्ये १०,२५,६७० रुपयांचा मजा नावाचा सुगंधीत तंबाखू तसेच १० प्लास्टिक पोत्यांमध्ये २,१६,000 रुपयांचा इगल नावाचा सुगंधीत तंबाखू आढळून आला.
पोलिसांनी ट्रक जप्त केला चालकाला अटक केली आहे. तसेच सुगंधीत तंबाखू संदर्भात भंडारा येथील अन्न सुरक्षा सहाय्य आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना पत्राव्दारे कळविण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी शाहरुख नासिर खान (२७ रा. नागपूर) व गणेश गुप्ता रा.चंद्रपुर यांच्यावर कलम १८८, २७२, २७३, ३२८, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ यानुसार गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी जालंधर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सपोनि संजय पांढरे, नापोशि झुमन वाढई, पोशि महेंद्र सोनवाने यांनी केली.