मुंबई : २५ ऑक्टोबर – आर्यन खान अटक प्रकरणाला आता मोठी घडामोड घडली आहे. पंच प्रभाकर साईलने व्हिडीओ प्रसिद्ध करून खंडणीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर एनसीबीने त्याचा दावा ग्राह्य धरू नये म्हणून मुंबई सत्र न्यायलयात धाव घेतली. पण, न्यायालयाने ही याचिका इथं दाखल करू नका, असं म्हणत समीर वानखेडे यांची याचिका धुडकावून लावली. त्यामुळे समीर वानखेडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
पंच प्रभाकर साईल याने काल एक व्हिडीओ प्रसिद्ध करून पंच किरण गोसावीवर २५ कोटी खंडणीचा आरोप केला होता. या २५ कोटीची डील ही १८ कोटींवर फायनल झाली होती. यातील ८ कोटी हे समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, असा दावा साईलने केला आहे.
प्रभाकर साईलच्या आरोपानंतर एनसीबीने एक पत्रक प्रसिद्ध करून जे काही सांगायचे ते कोर्टात सांगा, असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर आज प्रभाकर साईल याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही दावा केला आहे, तो ग्राह्य धरू नये म्हणून एनसीबीनं एनडीपीएस कोर्टात याचिका दाखल केली होती. आपल्यावर वैयक्तिगत आणि कुटुंबावर नको ते आरोप होत आहे, असा दावाही समीर वानखेडे यांनी केला होता.
परंतु, एनसीबीची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. एनसीबीनं योग्य कोर्टात दाद मागावी, असं सांगत याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. समीर वानखेडे आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार का हे पाहावे लागणार आहे.
प्रभाकर साईल यांनी NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. आरोप करणारा प्रभाकर स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे. केपी गोसावी हा जो व्यक्ती आहे ज्याचा फोटो आर्यन खानसोबत व्हायरल झाला आहे.