केवायसी करण्याच्या नावाखाली निवृत्त शिक्षकाला ४ लाख १४ हजारांचा गंडा

भंडारा : ८ ऑक्टोबर – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशातील अनेक नोकरदार वर्ग वर्क फ्रॉम होम करत आहेत. दरम्यान ते आपल्या कार्यालयीन आणि वैयक्तिक कामांसाठी असुरक्षित इंटरनेटचा वापर करत आहेत. त्यामुळे दरम्यानच्या काळात सायबर गुन्ह्यात देखील प्रचंड वाढ झाली आहे. सायबर चोरटे विविध मार्गांचा अवलंब करत नागरिकांना लाखोंचा गंडा घालत आहेत. वेळोवेळी सायबर पोलिसांकडून सतर्क केल्यानंतर अनेक नागरिक सायबर चोरट्यांच्या बतावणीला बळी पडत आहेत.
अशातच भंडारा जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील चिंचाळा येथील एका निवृत्त शिक्षकाला ४ लाख १४ हजार रुपयांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. एका अज्ञात भामट्याने स्टेट बँक ऑफ इंडिया मधून बोलत असल्याची खोटी माहिती देऊन, केवायसी करण्याच्या नावाखाली शिक्षकाची ऑनलाइन फसवणूक केली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, संबंधित शिक्षकानं पवनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे.
बबन हरी मुन असं फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचं नाव आहे. फिर्यादी मुन हे भंडारा जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातिल चिंचाळा येथील रहिवासी आहे. त्यांचं पवनी येथील स्टेट बँक ऑफ इंडियात खातं आहे. या खात्यात त्यांची पेंशन जमा होते.
दरम्यान एका अज्ञात भामट्याने मुन यांना फोन करत आपण स्टेट बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. तसेच केवायसी करण्याबाबत भीती निर्माण केली. तसेच केवायसी फॉर्म भरायचा असल्यास खाते क्रमांक, एटीएम क्रमांक आणि आधार क्रमांक मागितला. यानंतर अज्ञातानं मुन यांच्या बँक खात्यातून ४ लाख १४ हजार ५९९ रुपयांची रक्कम काढून घेतली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मुन यांनी पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण भंडाऱ्यात सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply