मुंबई : ७ ऑक्टोबर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू असून जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे. दरम्यान या कारवाईवर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भाष्य केले आहे.
अजित पवार आणि माध्यमांमुळे हे आयकर विभागाची धाड सुरु असल्याचे मला कळले आहे. या धाडी कशा संदर्भात सुरु आहेत हे अजित पवारच चांगल्या प्रकारे सांगू शकतात. तुम्ही पाप केले आहे, तुम्ही घोटाळे केले आहेत तर कबुल करा. अजित पवारच नव्हे तर देशातील कुठल्याही निर्दोष व्यक्तीला तपास यंत्रणांनी हैराण करु नये अशी आमची पण भूमिका आहे. मी कालही जरंडेश्वर येथे गेलो होतो. अजित पवारही काही दिवसांपूर्वी तिथे जाऊन आले आहेत. मग पवार साहेब जरंडेश्वरचा खरा मालक कोण? हे अजित पवारांनी सांगावे अशी माझी त्या २७ हजार शेतकऱ्यांतर्फे विनंती आहे, असे किरीट सोमय्या यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे.
केंद्रात मोदी सरकारला कामे करण्यासाठी निवडून दिले असून हे काय सुरु आहे असे अजित पवारांनी म्हटल्याचे पत्रकाराने विचारले असता त्यावर सोमय्या यांनी भाष्य केले. “जनतेने भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी नरेंद्र मोदींना मतदान केले. मोदीजी त्या दिशेने पुढे जात आहेत. ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्राला भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र करत आहेत म्हणून ही कारवाई आहे. हे सगळे ठाकरे पवारांचे नेते गेले अनेक महिने अमेरिकच्या पंतप्रधानांच्या गोष्टी करत आहेत. अजित पवार हे जे साखर कारनखाने ढापले त्याबद्दल का बोलत नाही. जर एवढा चांगला कारखाना चालू शकतो तर आमच्या नावाने का नाही चालवला असे शेतकरी विचारत आहे. चोरी केली आहे तर ती मान्य करावी लागेल,” अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली.
दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर बुधवारी सकाळी दाखल झाले होते. यावेळी सभासदांनी त्यांचे जंगी स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. किरीट सोमय्या यांनी यावेळी शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद पडणार नाही. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारखान्याच्या व्यवहाराची पूर्ण चौकशी होईल असं सांगितलं.