मुंबई : ७ ऑक्टोबर – एप्रिलनंतर अखेर महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या परवानगीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारपासून भाविकांसाठी मुंबईसह राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी पहाटेच जाऊन मंदिरे खुली करत दर्शन घेतले आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील सप्तश्रृंगी गडावर दर्शन घेतले. दरम्यान दर्शन करून परतत असताना वणी दिंडोरी रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झालेला होता. यामुळे प्रचंड वाहतुकीची देखील कोंडी झाली होती.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना छगन भुजबळ यांनी आपली वाहने थांबवून अपघातग्रस्त वाहनाच्या ठिकाणी पाहणी करत अपघात ग्रस्तांची चौकशी केली. तसेच याठिकाणी मदतकार्य करत असलेल्या संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत विचारपूस केली. तसेच याठिकाणी थांबून सर्व वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, करोनाच्या काळात सश्रद्ध माणसांना आधार आणि जगण्याचे मानसिक बळ दिले असे मानणाऱ्या भाविकांसाठी राज्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे आजपासून खुली करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मुंबादेवी मंदिरात जाऊन मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिराचे व्यवस्थापक आणि पुजाऱ्यांशी संवाद साधला. “आपली मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली होत आहेत. माझी सर्व जनतेला आणि भक्तांना विनंती आहे, की आनंदात राहा, मात्र करोनाचे नियम पाळून सुरक्षित राहा”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.