लखनऊ : ७ ऑक्टोबर – आपल्याशी उद्धटपणे वागल्याचा राग आल्यामुळे पोलिसांनी भाजप नेत्याची धुलाई केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये भाजपच्या विभाग अध्यक्षाला पोलिसांनी दुचाकीवरून खाली खेचलं आणि त्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
बदायूंमध्ये आपल्या मित्राच्या दुकानात झेरॉक्स घेण्यासाठी थांबलेले भाजपचे विभाग अध्यक्ष कुलदीप शर्मा यांची बाईक रस्त्यात आडवी असल्याचा आक्षेप घेत एका पोलीस शिपायाने त्यांना हटकलं. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आक्रमक रुप धारण केलं आणि बाचाबाचीला सुरुवात झाली. इतरही काही पोलीस अधिकारी आणि होमगार्ड तिथं आले आणि त्यांनी शर्मा यांना शिविगाळ करायला सुरुवात केली.
वाद विकोपाला गेल्यानंतर पोलिसांनी शर्मा यांना पकडून गाडीवरून खाली खेचलं आणि त्यांना मारहाण केली. बाईक रस्त्यातून हटवण्याची तंबी देत त्यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांना खेचत पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यावेळी शर्मा यांचं म्हणणं ऐकून न घेता पोलीस करत असलेल्या कारवाईला तिथं उपस्थित काही नागरिकांनी आक्षेपही घेतला. मात्र पोलीस कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
पोलिसांनी स्टेशनमध्ये नेऊन आपल्याला मारहाण केल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे. आपल्याला रस्त्यावर तर मारहाण झालीच, मात्र पोलीस ठाण्यातही मारहाण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शर्मा यांच्यासोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि अन्याय करणाऱ्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.