औरंगाबाद : २८ सप्टेंबर – मराठवाड्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील बहुतांश महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. तर, उस्मानाबादमधून जाणऱ्या तेरणा आणि मांजरा नदीला पूर आला आहे. मांजरा धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथे ग्रामपंचायत सभागृहात पाणी शिरल्याने १२५ जण अडकले आहे. इरला येथील प्राथमिक शाळेत १५० जणांना सुखरूप हलविण्यात आले असून पुराच्या पाण्यातून चौघा जणांची तेर येथून सुटका करण्यात आली. तर दाऊदपूर येथे अद्याापही सहाजण अडकलेले आहेत. पुणे येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील मांजरा धरणाचे आठराही दरवाजे उघडण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील सारसा गावातील लोक अडकले असल्याची माहिती आहे. पावसाचा वेग अजूनही जोरदार आहे. औरंगाबाद शहरातही गेल्या दोनासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर आणि कन्नड या दोन तालुक्यांना पुराचा फटका बसला असून शिऊर-आलापूर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बनोटी, निंबायती, निंभोरा, सावळदबारा, पित्तूर या गावांत घरांची पडझड झाली असून काही घरांमध्ये पाणीही शिरले आहे.
सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धानोरा ते पूर्णवाडी या भागात पाणीच पाणी झाले आहे. पूर्ण नदीला पूर आल्याने काकडेवाडी या गावाचा संपर्क तुटला आहे. शिवनाटाकळी हे धरण भरल्यामुळे १६ हजार क्यूसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. कन्नड व गंगापूर तालुक्यातील नदी किनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात २४ तासात सावधनतेचा इशारा देण्यात आला असून अंबाजोगाई आणि केज येथील पुरस्थितीचा सामना करणाऱ्यांना सुखरुप हलविण्यात आल आहे. अंजनापूर, आपेगाव, इस्तळ येथेही काही नागरिक अडकून पडले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातही रात्रभर पाऊस सुरू आहे. पुरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील जवान पोहचत असून काही ठिकाणी पुरातील व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे.