मुंबई : ८ सप्टेंबर – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या माध्यमातून अनिल देशमुखांविरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे. परमबीर सिंह यांना वाचवण्यासाठी एनआयए ने प्रयत्न केला आहे. त्यामुळे एनआयएच्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंह यांना आरोपी करण्यात आले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाले असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना केला आहे.
एनआयए ने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी ५ लाख रुपये माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिले होते, असे सायबर एक्स्पर्टने सांगितले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. एनआयएच्या चार्जशीटमध्ये असलेल्या मुख्य आरोपींची चौकशी झाली नाही. एक्स्टॉरशनच्यासाठी हे सगळं कटकारस्थान सचिन वाझे याने केले आहे. त्यात पूर्ण सत्य आहे असं आमचं मत नाही. बरंच काही यातून बाहेर येऊ शकत होतं. परंतु, एनआयएने तसा तपास केला नाही. काही लोकांना वाचवण्याचं काम एनआयए ने केले. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान दिल्याचा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.