नागपूर : ३१ ऑगस्ट – वाघांची हाडे आणि हरणाच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र वनविभागाच्या वनकर्मचाऱ्यांना यश आले होते. ही घटना वाटते तितकी लहान नसून, याची पाळेमुळे खोलपर्यंत गेली असल्याचा अंदाज वनविभागाला आधीपासूनच होता. त्यानुसार ते या प्रकरणाच्या खोलाशी जाण्यासाठी प्रयत्नरत होते. त्यात त्यांना यश आले असून, या प्रकरणी आणखी दोन आरोपींना महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात वनकर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे. यापैकी एका आरोपीने आत्मसमर्पण करीत वनविभागाला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार या प्रकरणात आणखी काही आरोपी सापडण्याची शक्यता आहे.
सदर प्रकरणात २६ ऑगस्ट रोजी कैलास भलावी रा. बनेरा याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून वाघ शिकार प्रकरणातील हाडे जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याच प्रकरणात सामील असलेला आरोपी राहुल भलावी रा. बनेरा ता. पारशिवणी याच्या मागावर पेंच व्याघ्र प्रकल्पाची टीम २ दिवसापासून होती. बरीच ठिकाणे बदलल्यावर या टीमने पाठलाग सुरू ठेवल्याने आरोपीला आत्मसमर्पण करण्यास वनविभागाने भाग पाडले. त्याच्या माहितीवरून आणखी अंदाजे २ किलो वाघाची हाडे जप्त करण्यात आली. सदर हाडे ही प्राथमिक माहिती नुसार देवलापर वनपरिक्षेत्रातील पिंडकेपार भागातील वाघाच्या शिकारीतीलच असल्याची शक्यता असून व त्याबाबत मध्यप्रदेश इथे वन गुन्हा दाखल केला आहे. सदर दोन्ही आरोपी मध्यप्रदेश वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. यात पुढील तपास सुरू आहे.
सदर प्रकरणात आंतरराज्य जाळे असल्याने वन्यजीव अपराध नियंत्रण कक्ष, मध्य विभाग, जबलपूर, क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र, क्षेत्र संचालक पेंच, मध्य प्रदेश, मुख्य वन संरक्षक नागपूर व मुख्य वन संरक्षक, शिवणी हे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत. सदर कारवाई उपसंचालक पेंच व उपवनसंरक्षक नागपूर यांच्या मार्गदर्शनात अतुल देवकर, रामटेकचे संदीप गिरी, उमरेडचे नरेंद्र चांदेवार आदींनी पार पाडली.