गडचिरोली : ३० जुलै – अनेक वर्षांपासून नक्षल कारवायात सामील असणाऱ्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी नेहमीच्या हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून आज पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. हे दोघेही पती-पत्नी असून दोघांवरही अनेक गुन्हे दाखल आहेत. पतीवर शासनाने ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले असून पत्नीवर २ लाखांचे बक्षीस आहे.
विनोद उर्फ मणिराम नरसू बोगा (३२), राहणार बोटेझरी तालुका कोरची जिल्हा गडचिरोली आणि कविता उर्फ सत्तो हरिसिंग कोवाची असे या दोघांचे नाव असून हे दोघेही पती-पत्नी आहेत. विनोद बोगा हा कोरची दलममध्ये एसीएम पदावर दलम डॉक्टर या पदावर कार्यरत होता तर त्याची पत्नी कविता कोवाची ही पार्टी मेम्बर या पदावर कार्यरत होती. विनोद याच्यावर १३ खून, २१ चकमकी, ०१ जाळपोळ व इतर ५ असे ४० गुन्हे दाखल असून त्याच्यावर शासनाने सहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तर कविता हिच्यावर ५ चकमकी, १ जाळपोळ व इतर ३ असे ९ गुन्हे दाखल असून तिच्यावर २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
नक्षल्यांवर असलेले कोरोनाचे सावट व नेहमीच्या हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून या दोघांनी आज आत्मसमर्पण केले. व एक सज्जन नागरिक म्हणून जीवन जगण्याचे वचन पोलिसांना दिले.