वाहनचालकाने स्वतःचेच पैसे वसूल कारण्यासाठी रचला लुटमारीचा कट

भंडारा : ३० जुलै – धानाच्या व्यापाऱ्याकडून घेणे असलेले १० लाख रुपये दोन वर्षापासून मिळत नसल्याने व्यापाऱ्यांचा काटा काढून स्वतःचे पैसे काढून घेण्यासाठी व्यापाऱ्याच्या दिवाणजीलाच लूटण्यात आले. दिनाणजीचा वाहनचालक असलेल्या व्यक्तीनेच हा सर्व कट रचून तो पूर्णत्वास नेला. दोन दिवसापुर्वी घडलेल्या या सिनेस्टाईल लुटमारीचा खुलासा पोलिसांच्या यशस्वी तपासानंतर झाला असून याप्रकरणात ८ आरोपींना भंडारा पोलिसांनी अटक केली. सोबतच चोरीला गेलेले २२ लाख रुपयाची रोकडही हस्तगत केली. जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली.
आंध्रप्रदेशातील धान्य व्यापारी रमेश अन्ना यांच्या धान्यखरेदी विक्री व्यवहाराचे पैसे घेण्यासाठी माशेट्टी श्रीनिवास भास्कर नावाचा दिवाणजी २० जुलै रोजी गोदिंया येथे आला होता. वॅगन आर वाहनाने आलेल्या दिवाणजीचा चालक म्हणून रामदास काशिनाथ भिडकर हा होता. गोंदिया येथील राईस मिल्स मालकाकडून पैसे घेतल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील काम आटोपून परत जात असताना साकोली तालुक्यातील गोंडउमरी गावाजवळ रात्री १० वाजताच्या सुमारास अपघात झाल्याचा देखावा पुढे करून मदतीसाठी हात देणाऱ्या तरुणाच्या मदतीला जाण्याचा तयारीत असलेल्या भास्कर आणि रामदास यांच्यावर आजुबाजूला लपून बसलेल्या ८ जणांनी हल्ला चढविला.
मारहाण करीत चाकुचा धाक दाखवून गाडीत असलेली २२ लाख ५० हजार रुपयांची बॅग चोरून नेण्यात आली होती. याची तक्रार साकोली पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर साकोली पोलिसांचे दोन आणि गुन्हे शाखेचे चार पथके तयार करून या घटनेचा तपास करण्यात आला. वाहनचालक रामदास याच्या चौकशी दरम्यान संशय आल्याने त्यादृष्टीने तपास केला गेल्यानंतर यात त्याचा हात असल्याचे उघड झाले. रामदास याचा धर्मापुरी येथील साळा चेतन शिवनकर याला ताब्यात घेतल्यानंतर खरे सत्य बाहेर आले. याच आधारे नागपूर व परिसरातील अन्य ६ आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हा संपूर्ण कट चालक रामदास भिरकड याने त्याचा मित्र गुढ्ढू सोनटक्के याचा मदतीने रचला होता. धान व्यापारी असलेल्या रमेश अन्ना याच्याकडे रामदास याच्या मालकीचे ट्रक धान्याची ने-आण करण्यासाठी उपयोग आणले जात असल्याने त्यांचे व्यावहारीक संबंध होते. दोन वर्षापासून रामदास याचे १० लाख रुपये रमेश यांच्याकडून घेणे होते. मात्र ते मिळत नसल्याने दरोड्याचा कट रचण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. नेहमीप्रमाणे वसुली करून दिवाणजीला पसळगाव मार्गे न नेता कोकणा मार्गाने नेऊन दरोड्याचा कट रचला गेल्याचे ते म्हणाले. साकोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या तत्परतेने आरोपींना जेरबंद करण्यात यश आल्याचे पोलिस अधीक्षक म्हणाले. पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी वायकर, पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, जितेंद्र बोरकर उपस्थित होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रामदास चालक याच्यासह गुढ्ढू सोनटक्के, चेतन शिवनकर, प्रकाश चिचोंळकर, आशिष कळपते, संजय राणे, रेखराम सोनटक्के, शशिकुमार सोनटक्के यांचा समावेश आहे.

Leave a Reply