लसीकरण झालेल्यांच्या लोकल प्रवासासाठी मनसे आक्रमक

मुंबई : ३० जुलै – सर्वसामान्यांना त्यातही लसीचे दोन घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, म्हणून मनसे आक्रमक झाली आहे. गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याविषयी पत्र लिहिलं होतं. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला इशारा दिला आहे. ज्यांनी लसीचे २ डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर मनसे रेलभरो करावं लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
ज्यांनी लसीचे २ डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या. राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती, नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
लसीचे दोन डोस घेतल्ल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळावी, या मागणीसाठी मनसे सातत्याने पाठपुरावा करत आहे. राज्य सरकारचा देखील त्यावर विचार सुरु आहे. परंतु अनलॉकिंग करताना एकदम शिथीलता न देता हळू हळू निर्बंध उठवले जातील. येत्या काही दिवसांत मुंबई लोकल सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. ज्यांनी लसीचे २ डोस घेतलेत त्यांच्यासाठी मुंबई लोकल तातडीने सुरु करा, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
“मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालय सुरु आहेत. सर्वाना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्यानं रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे ‘बस सुरु आणि लोकल बंद’ ह्यानं नेमकं काय साध्य होणार?”
“महाराष्ट्र सरकारनं निबंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरु करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू करेल.”
“त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना अशी मागणी करतो आहे की, मुंबईकरांचे रोजचे हाल थांबविण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीनं सुरु केली जावी. विविध प्रकारच्या मोहीमा हातात घेऊन लसीकरण वाढवावे म्हणजे अधिकाधिक लोक लोकल प्रवासाचा लाभ घेऊ शकतील, आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल. मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार ह्या सगळ्याचा विचार करून त्वरित पावलं उचलेल…”

Leave a Reply