नवी दिल्ली : ३० जुलै – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज एक नवा नारा दिल्याचे समोर आले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, लोकशाही पुढे गेली पाहिजे. लोकशाही वाचवा, देश वाचवा हा आमचा नारा आहे. ममत बॅनर्जी शरद पवारांची भेट घेणार होत्या, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी शरद पवारांशी बोलले. हा दौरा यशस्वी झाला आहे. आम्ही राजकीय हेतूसाठी भेटलो होतो. लोकशाही पुढे गेली पाहिजे. आमचा नारा ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा देतोय. आम्ही दर दोन महिन्यांनी इथे येत राहू.
विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्नशील असलेल्या ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होत्या, त्यांच्या दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बनर्जी यांच्या निवासस्थाहून निघताना वरील माहिती दिली आहे
ममता बॅनर्जींनी आपल्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, कमलनाथ, आनंद शर्मा, अभिषेक मनु सिंघवी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींच्या भेटी घेतल्याची माहिती आहे. शिवाय, करोना वॅक्सीन आणि बंगालचे नाव बदलण्याच्या विषयावर त्यांनी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतल्याचे समोर आले आहे.