टोकियो : ३० जुलै – भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं टोकयो ऑलिम्पिकमध्ये सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं सिल्व्हर मेडल पटकावले होते. आता आणखी एका ऑलिम्पिक मेडलपासून सिंधू फक्त एक विजय दूर आहे. तर ऐतिहासिक गोल्ड मेडल जिंकण्यासाठी सिंधूला दोन मॅच जिंकण्याची गरज आहे.
सिंधूनं जपानच्या अकाने यामागूचीचा २१-१३, २२-२० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. ही सध्या बॅडमिंटनमध्ये चौथ्या क्रमांकावर असून सिंधू सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर यामागूचीला आपल्या देशात खेळण्याचाही फायदा होता. सिंधू पहिल्या गेममध्ये ४-६ ने मागे पडली होती. त्यानंतर तिनं कमबॅक करत ११-७ अशी आघाडी घेतली. सिंधूनं आघाडी घेतल्यानं यामूगाचीनं जोरदार प्रतिकार केला. दोन्ही खेळाडूंनी यावेळी काही चांगले फटके लगावले. पण सिंधूनं पहिल्या सेटमध्ये सरस खेळ करत तो सेट २१-१३ नं जिंकला.
दुसऱ्या गेमध्ये बरोबरी साधण्यासाठी यामागूचीनं जोरदार प्रयत्न केला. पण सिंधूच्या धडाक्यापुढं तिचं काहीही चाललं नाही. सिंधूनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत यामूगूचीवर आघाडी घेतली. सिंधूच्या आक्रमक खेळापुढे जपानच्या अव्वल खेळाडूनं चुका केल्या. सिंधूनं सुरुवातीला ११-६ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर यामागूचीनं मॅचमध्ये पुनरागमन करत १५-१५ अशी बरोबरी साधली. सिंधू या गेमममध्ये १८-२० अशी मागे पडली होती. त्यानंतर सिंधूनं सलग ४ पॉईंट्स जिंकत हा गेम आणि सामना जिंकला.
सिंधूनं या स्पर्धेतील मागील ३ मॅचमध्ये आक्रमक खेळ केला होता. तीनं पहिले तीन्ही सामने सिंधूनं सरळ गेममध्ये जिंकले होते. त्यानंतर क्वार्टर फायनलमध्येही सिंधूकडून याच प्रकारच्या खेळाची अपेक्षा होती. सि्ंधूनं ती अपेक्षा पूर्ण करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
सिंधू आणि यामागूची यापूर्वी १८ वेळा आमने-सामने आल्या होत्या. त्यामध्ये ११ वेळा सिंधूनं लढत जिंकली होती. सिंधूनं यापूर्वी २०१९ साली झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये यामागूचीचा पराभव केला होता.