बुलढाणा : ३० जुलै – गॅस कटरच्या सह्ह्याने चिखली तालुक्यातील शेलुद व उंद्री येथील एटीएम सह खामगांव तालुक्यातील पळशी बु. येथील एटीएम मशीन फोडून चारटयांनी लाखो रुपयांची रक्कमं लंपास केली. सदर घटना आज दि ३० जुलैच्या पहाटे घडली असून घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावार , बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बळीराम गिते, चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी भेट दिली. यावेळी ठसे तज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.
संपूर्ण जिल्यालेत खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेची पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की , चिखली पासून जवळच असलेल्या शेलुद या गावामध्ये स्टेट बँकेच्या बाजुला बँकेचे एटीएम आहे. आज दि ३० जुलै रोजी पहाटे अंदाजे दिड वाजेच्या सुमारास तीन चोरटे चेहरा बांधून आले त्यावेळी एटीएम शटर बंद होते. चोरटयांनी गॅस कटरच्या सह्याने शटर तोडले, मात्र त्यापुर्वी त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सी.सीटीव्हीच्या वायर कापून टाकल्या. शटर तोडल्यानंतर गॅस कटरने एटीएम फोडले व त्यातुन २७ लाख २१ हजार रुपयांची रक्कम गायब केली.
आज दि ३० जुलै रोजी सकाळी बँकेचे कॅशिअर अनिल सुरडकर बँकेत आले असता त्यांना एटीएम फोडल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने चिखली पोलीसांना कळविल्यानंतर ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी आपल्या चमुसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अशाच प्रकारे तालुक्यातील उंद्री येथील एटीएम मधून ९ लाख रुपये व खामगांव तालुक्यातील पळशी बुद्रुक येथील एटीएम मधून १९ लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली असून सदर तिन्ही प्रकरणात ५५ लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात चोरटे यशस्वी ठरले आहेत.