श्रीनगर : ३० जुलै – जम्मू-काश्मीर मध्ये पुन्हा एकदा संशय़ास्पद ड्रोन दिसले आहेत. जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात गुरुवारी रात्री तीन ठिकाणी हे संशयास्पद ड्रोन दिसून आले. रात्री ८.३० ते ९.३० वाजण्याच्या सुमारास हे संशयास्पद ड्रोन दिसून आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बारी-ब्राह्मण, चिलाद्या आणि गगवाल परिसरात एका तासाभरात हे ड्रोन दिसून आले. यापैकी दोन आर्मी कॅम्प आणि आयटीबीपी कॅपच्या जवळ दिसून आले. संशयास्पद ड्रोन दिसून आल्यावर बीएसएफ ने गोळीबार केला त्यानंतर हे तिन्ही ड्रोन गायब झाले.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी ड्रोन भारतीय सैन्याने पाडलं होतं. त्यानंतर आता पुन्हा संशयास्पद ड्रोन दिसून आल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. ड्रोन दिसल्यावर बीएसएफ जवानांनी गोळीबार करताच ते गायब झाले. यानंतर सुरक्षा दलाकडून आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुद्धा घेतलं.
काही दिवसांपूर्वी येथील सीमावर्ती भागात कांचक परिसरात पोलिसांनी पाच किलो आयईडी सामग्री घेऊन जाणाऱ्या एका पाकिस्तानी ड्रोनला पाडलं होतं. बीएसएफ जवानांनी पाकिस्तानात परतणाऱ्या ड्रोनवर गोळ्या झाडल्या आणि ते खाली पाडलं होतं.
ड्रोन व्यतिरिक्त एलओसी जवळ पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स लिहिलेला एक फुगा सुरक्षा यंत्रणांना काही दिवसांपूर्वी दिसून आला होता. या फुग्यावर पाकिस्तानचा झेंडा सुद्धा होता. जम्मू-काश्मीरमध्ये २७ जून रोजी भारतीय हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ल्याचा वापर केल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर आता वारंवार ड्रोन या परिसरात दिसून येत आहेत.