चंद्रपूर : ३० जुलै – चंद्रपूर शहर महापालिकेच्या आमसभेत झालेल्या सत्ताधारी-विरोधकांच्या गोंधळात गंभीर प्रकार घडला. आमसभेचा अजेंडा बाहेर जातोच कसा, या विषयावरून महापौर राखी कंचर्लावार यांच्या ‘नगरसेवक पती’ने महापालिकेच्या उपायुक्त-अतिरिक्त आयुक्तांना शिवीगाळ-दमदाटी केल्याचा आरोप आहे. महापौर कक्षात नगरसेवकांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत मनपा उपायुक्त विशाल वाघ यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात महापौरांचे पती संजय कंचर्लावार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर शहर महापालिकेच्या आमसभेत झालेल्या सत्ताधारी-विरोधकांच्या गोंधळातील दुसरे गंभीर प्रकरण पुढे आले आहे. गोंधळानंतर महापौर कक्षात एक बैठक झाली. यात अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल आणि उपायुक्त विशाल वाघ यांच्यावर महापौर सत्ताधारी नगरसेवक बरसले. आमसभेचा अजेंडा बाहेर जातोच कसा या विषयावरून महापौरांचे नगरसेवक पती संजय कंचर्लावार आक्रमक झाले. त्यांनी उपायुक्त-अतिरिक्त आयुक्तांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.
महापौर कक्षात खुद्द महापौर राखी कंचर्लावार आणि काही नगरसेवकांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडल्याचं वाघ यांनी तक्रारीत म्हटलं आहे. तुम्ही बाहेरगावचे आहात, सांभाळून राहा, चार-चौघं पाठवून कोणत्या वॉर्डात मारुन फेकलं कळणारही नाही, अशी सर्वांसमक्ष धमकी दिल्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे.
नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत उपायुक्त वाघ यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. उपायुक्त विशाल वाघ यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात महापौरांचे पती संजय कंचर्लावार यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय. यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.