कोल्हापूर : ३० जुलै – मी आता ठाकरे सरकारच्या पूरस्थिती हाताळण्याचं मूल्यमापन करणार नाही. पण पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर झाल्यानंतर नक्कीच बोलेन, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. मी आता ठाकरे सरकारच्या पूरस्थिती हाताळण्याचं मूल्यमापन करणार नाही. ही ती वेळ नाही. आता पहिल्यांदा त्यांनी मदत घोषित केली पाहिजे. एकदा मदत घोषित केली तर मूल्यमापन नाही, पण ती मदत योग्य आहे की अयोग्य आहे या संदर्भातील भावना मी व्यक्त करेल, असं फडणवीस म्हणाले.
एनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्रं लिहिल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदी सरकारनेच हे निकष बदलले आहे. हे निकष इतके वर्ष तसेच होते. 2015 साली निकष बदलले. नव्या निकषाने मदत सुरू केली. दर पाच वर्षांनी निकष बदलत नसतात. पण केंद्राने निकष बदलले तर चांगलं होईल. केंद्राकडे तशी मागणी करता येईल, असं सांगतानाच पण निकष तोकडे होते. ते बदलून दुपटीने मदत देण्याचे निकष मोदी सरकारनेच तयार केले हेही अधोरेखित केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
पॅकेज असो की घोषणा, सामान्य माणसाला पैसे मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री त्याला काहीही म्हणू देत, पण त्यांना मदत जाहीर करा, असं फडणवीस म्हणाले. मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. मी ह्याच्या आधी देखील सांगितलं आहे की, मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. मपण सगळ्या पूरग्रस्तांना मदत नक्की करेन, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात बोलताना केला. त्यावर फडणवीसांनी टोला हा लगावला.
सरसकट भिंत बांधणं किती योग्य आहे हे माहीत नाही. अर्थात शासनाने काही सांगितलं असेल. किंवा मुख्यमंत्र्यांनी काही अभ्यास केला असेल. पण पूर संरक्षक भिंत काही ठरावीक ठिकाणी बांधता येते. ती काही चीनच्या भिंती सारखी सरसकट बांधता येत नाही. त्यामुळे ती नेमकी कुठे बांधता येईल याचा विचार करावा लागेल. पूर संरक्षक भिंत बांधणं ही अनेक उपाययोजनांपैकी एक असू शकते. ती विविक्षित भागात होऊ शकते. ती सरसकट बांधता येत नाही. माझं जे छोटं ज्ञान आहे, त्यानुसार सरसकट भिंत बांधणं योग्य होणार नाही. त्यावर सरकार अभ्यास करेल, असं फडणवीस म्हणाले.