पुणे : २९ जुलै – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयीच्या आठवणी सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
बाबासाहेब पुरंदरे यांनी कधीच इतिहासाला धक्का लावलेला नाही. त्यांनी फक्त खरं तेच सांगितलं. त्यांनी दंतकथा मांडल्या नाहीत. मी लहानपणापासून बाबासाहेबांची व्याख्याने ऐकत आलो आहे. त्यांनी त्यांच्या लिखाणातून फक्त सत्य मांडलं आहे. जेव्हा दंतकथा असतील, त्यावेळी ते तसा उल्लेख करत होते की या दंतकथा आहेत.बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर झालेल्या टीकेबद्दल राज ठाकरे म्हणाले, ज्यांना जातीवरुन मतदान हवं आहे, त्यांनी केलेल्या या गोष्टी आहेत. ज्यांना जातीभेद पेरायचा आहे, त्यांनी स्वतः काही वाचायचं नाही आणि अशा गोष्टी पसरवायच्या आणि जातीभेद पसरवून आपली पोटं भरायची असतात. त्यांच्याकडे बाबासाहेबांनी दुर्लक्ष करणंच योग्य होतं.