सिंधुदुर्ग : २९ जुलै – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या खालच्या भाषेतील टीकेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आता भाजप आमदार आणि नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली. “कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये”, अशी टीका नितेश राणेंनी केली. ते सिंधुदुर्गात बोलत होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांना झापताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका केली. मी चिपळूणमधली सगळी पाहणी करुन झाली तरी एकही अधिकारी मला येऊन आणखी भेटला नाही, हे काही बरोबर नाही, हे मी खपवून घेणार नाही, अशी तंबी राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यावर अधिकारी सीएमसाहेबांना निरोप देण्यासाठी गेले आहेत, असं समोरील अधिकाऱ्याने सांगताच, सीएम गेला उडत… मला कुणाची नावं सांगू नका, असा वार राणेंनी केला होता.
हे लोक दौरा अधिकार्यांना पाहण्यासाठी करतात का? मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही, कुणीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, असा हल्लाबोल अजित पवारांनी केला.
“कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये”, असा जहरी वार नितेश राणेंनी अजितदादांवर केला. ते सिंधुदुर्गात बोलत होते.
सातत्याने पवार कुटुंबात विसंगती दिसते. अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाही. पार्थ पवार ,सुप्रिया सुळे अस बोलताना कधी दिसले नाहीत. रोहीत पवारांनी आपल्या आजोबांकडून योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यांचं ऐकलं पाहिजे. नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावे असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो. म्हणून रोहीतजींनी थोडं शिकून मगच पावल टाकावीत असा माझा मैत्रीचा सल्ला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.