दिल्ली दौरा नवीन मंत्र्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी – चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण

नागपूर : २९ जुलै – झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणात झारखंड पोलिसांनी राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग असल्याचा खुलासा केल्याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली. त्यानंर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत झारखंड सरकार पाडण्यासंदर्भात करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तर या प्रकरणी चौकशी होणार असल्याचे समोर येताच बावनकुळे यांनी १५ जुलै रोजी दिल्लीचा दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्या दरम्यान त्यांची झारखंड येथील आमदारांसोबत बैठक झाल्याचं बोलले जात आहे. या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, ते म्हणाले की होय मी दिल्लीला गेलो होतो. पण राजकीय कामासाठी नाही तर नवीन मंत्र्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी दिल्लीला गेलो होतो, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
झारखंड पोलिसांनी केलेल्या खुलाशानुसार हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात असलेल्या सरकारला पडण्याचे षडयंत्र रचले जात होते. या अंतर्गत आमदारांची खरेदी विक्री करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले होते. या संदर्भात अनुप सिंग नावाच्या आमदाराने केलेल्या तक्रारींवरून झारखंड पोलिसांनी रांची येथील एका हॉटेलमध्ये धाड टाकून तिघांना अटक केली होती. यामध्ये निवारण महतो, अमित सिंग आणि अभिषेक दुबे यांचा समावेश आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील भाजपा नेते झारखंड सरकार पडण्याचे षडयंत्र रचत आहेत. झारखंड पोलिसांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.दिल्लीवारी केवळ सदिच्छा भेटीसाठीच केली:- बावनकुळेझारखंड सरकार अस्थिर करण्यासाठी सरकार मध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षाच्या आमदारांना पैशांचे आमिष दाखवले जात असल्याचा खुलासा झारखंड पोलिसांनी केला होता. या प्रकरणाचे नागपूर कनेक्शन पुढे आल्यानंतर आता बावनकुळे यांच्या दिल्लीवारी सोबत या प्रकरणाचा संबंध जोडला जात आहे. बावनकुळे यांनी देखील १५ जुलै रोजी दिल्लीला गेल्याचं मान्य केले आहे. मात्र दिल्ली दौऱ्याचा उद्देश केवळ नवनियुक्त मंत्र्यांच्या भेटी घेणे एवढाच होता, असा दावा त्यांनी केला आहे. या दौऱ्यात माझी झारखंडच्या कोणत्याही नेत्यांशी किंवा आमदारांसोबत भेट झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मी राष्ट्रीय नेता नाही -मी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षात काम करतो, त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात माझा कोणताही सहभाग नसल्याने इतर राज्यातील आमदारांसोबत माझे नाव जोडण्यात कोणतेही तथ्य नसल्याचे, मत बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे

Leave a Reply