नागपूर : २९ जुलै – राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान आनंदाची बातमी म्हणजे शुक्रवारपासून म्हणजेच उद्यापासून १० हजारांची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी या मदतीसंदर्भातली माहिती दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, पूरग्रस्तांना तातडीनं मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून १० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. रोख रकमेचं वाटप केलं तर पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्यापासूनच पूरग्रस्तांच्या थेट खात्यात हे पैसे जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तातडीनं पंचनामे करुन ८ दिवसात अहवाल देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हा अहवाल केंद्राला पाठवण्याचे आदेश देण्यात आलेत. या पावसामुळे ४ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचंही ते म्हणाले.